।। उगा कां काळीज माझे उले ।।
पाहुनी वेलीवरची फुले
कधी नव्हे ते मळले अंतर
कधी न शिवला सवतीमत्सर
आज का लतिकावैभव सले ?
काय मना हे भलते धाडस ?
तुला नावडे हरिणी पाडस
पापणी वृथा भिजे का अले ?
गोवत्सांतील पाहून भावा
काय वाटतो तुजसी हेवा ?
चिडे का मौन तरी आंतले ?
कुणी पक्षिणी पिला भरविते
दृश्य तुला ते व्याकुळ करिते
काय हे विपरीत रे जाहले
सतःस्वतःशी कशास चोरी ?
वात्सल्य विन अपूर्ण नारी
कळले सार्थक जन्मातले
मूर्त जन्मते पाषाणातून
कौशल्या का हीन शिळेतून ?
विचारे मस्तक या व्यापिले
गगन अम्हांहूनि वृद्ध नाही का ?
त्यात जन्मती किती तारका !
अकारण जीवन हे वाटले
। गीतकार : ग. दि. माडगूळकर ।
। संगीतकार : सुधीर फडके ।
। गायक : सुधीर फडके ।

0 Comments